Featured Post

THE RAPE BY A SOCIETY

The whole country is justifiably worked up over the brutal rape of a Delhi medical student in a bus. As one would expect, the reactions...

Thursday, October 20, 2016

डॉक्टर, तुम्ही सुद्धा.............आजारी?





       दररोज वैद्यकीय व्यावसायिकांवरील हल्ल्यांच्या बातम्या आणि त्यांचे अधिकाधीक गंभिर होत चाललेले स्वरुप यांनी माझ्यासारख्या (बहुतांशी!) तत्वनिष्ठ आणि शास्त्रनिष्ठ प्रँक्टीस करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांना सुन्न करुन टाकले आहे.
या घटनांचे वृत्तदेखिल (मग ते वृत्तपत्रांतील असो वा TVवरील असो) किती एकतर्फी असते! एखादा अनुभवी आणि हुशार धन्वंतरी देखिल कदाचित्  जिथे गोंधळेल, तिथे मृत्यूनंतर काही क्षणांतच सगळ्या निवेदिका छातीठोकपणे ओरडत सुटतात, "डाक्टरकी लापरवाहीसे मरीजकी मौत!" त्यांना ना काही चाचण्या लागतात, ना Post-Mortem! या विषयाला धरुन वेगवेगळया वाहिन्यांवरील तथाकथीत Special Reports, Panel Discussions आणि Sting Operations, यांनीतर ताळतंत्रच सोडलाय!
हे सारं बघुन मला घटकाभर कळेनासं होतं की, ही चर्चा परंपरेने "जगातील सर्वात उदात्त व्यवसाय" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैद्यकीय व्यवसाय आणि व्यावसायिकां विषयी आहे, की देशद्रोही, दहशतवादी, बलात्कारी अश्या सामाजिक शत्रूंविषयी आहे!
'डॉक्टर आणि पेशंट निर्वाणीच्या लढाईकरीता एकमेकांसमोर दंड थोपटून ठाकले आहेत' असे जे एक चित्र निर्माण झालं आहे त्या पार्श्वभूमीवर मला मी माझी practice सुरु केली होती ते दिवस आठवतात.
गोष्टं काही फार जूनी नाही, सन १९८३; कोकणातलं एक छोटसं गाव; तालुक्याचं ठीकाण; जेमतेम - हजार वस्ती. आणि मी, नुकताच MBBS होऊन बाहेर पडलेला, २२-२३ वर्षांचा, कोवळा पोरगा! काय मला जगाची आणि व्यवहाराची जाण असणार? पण, हां हां म्हणता पंचक्रोशीतल्या लोकांनी मला आपला करुन टाकला!
      शिवारातली ताजी भाजी असो, सुगीला काढलेल्या नव्या तांदळाचे पोहे असोत, किंवा घरचे एखादे शुभकार्य असो; माझे पेशंट माझी आठवण हमखास ठेवत. 'पैसे नसले तर उधार ठेवतो ' किंवा  एखाद्या गरीब पेशंटला सँपलची औषधे फूकट देतो' केवळ एवढ्यामुळे ही आपुलकी नव्हती. कारण, ते प्रेम काही मला एकट्याला मिळत नव्हते! गावातील माझ्या बहूतेक सर्व सहव्यावसायिकांना थोड्याफार फरकाने अशीच वागणूक मिळत होती. आणि आमच्यापैकी कोणीच धर्मादाय समाजसेवा करत नव्हता! प्रत्येकजण, चांगला पैसे कमवण्याचा धंदाच करत होता!
पण तरी, मिळणारे प्रेम निखळ होते; आपुलकी आणि विश्वास बावनकशी होता.
एक प्रसंग तर माझ्या मनात कायमचा घर करुन बसलाय. दोन वर्षं माझे नियमित पेशंट असलेलं एक कुटुंब; सहा महिन्यापूर्वी वाजत-गाजत घरी आणलेली सून 'नांदायचं नाही' असं म्हणून माहेरी निघून गेली! दोन्ही पक्षांच्या बैठका होऊन सर्वमान्य तोडगा निघाला, डॉक्टरांनी मध्यस्थी करावी! मला सांगता-विचारताच!
सुनबाईचा म्हणे सासरच्या लोकांपैकी फक्त माझ्यावरच विश्वास होता! (आणि विशेष म्हणजे, त्यामुळे कोणाच्याही मनात-तिच्या नवऱ्याच्या सुद्धा- तिच्या-माझ्या विषयी अजिबात संशय-शंका नाही!) मुलीचे सासु-सासरे, आई-वडील मला दवाखान्यात येऊन भेटले, सारी पार्श्वभूमी सांगितली. मी मुलीशी (खाजगीत) बोललो. माझ्या अकलेनुसार शहाणपणाच्या चार गोष्टी सांगितल्या. मुलगी माझं ऐकून परत सासरी आली. तीस वर्षं झाली छान सुखाचा संसार करते आहे!
माझे कौतुक म्हणून नाही, तर आजच्या काळात असली आपुलकी आणि भरवसा परिकथेसारखे वाटतात म्हणून गोष्ट सांगितली.
आज मी तोच आहे, गावातले बहूसंख्य practitioners तेच आहेत, पेशंटही तेच आहेत.....
मग मला प्रश्न पडलाय, ते प्रेम, ती आपुलकी, तो विश्वास गेला कुठे? दरम्यानच्या काळात असं काय घडलं, की तेच पेशंट, आपल्या त्याच डॉक्टरांना साताजन्मांचे वैरी असल्यासारखे पाहतात? आणि डॉक्टरांना आपल्या त्याच पेशंटची चक्क भिती वाटते! मी देखिल दररोज कामावर निघताना परमेश्वराची हात जोडून एकच विनवणी करतो,"देवा, आज माझ्यावर माझ्या पेशंटचा (किंवा त्याच्या नातेवाईकांचा) मार खायची वेळ आणू नको, म्हणजे सगळे भरुन पावले"!
खुप विचार केला तेव्हां लक्षात आलं. दोन गोष्टी या समिकरणात नविन आल्यात.
एक म्हणजे प्रसारमाध्यमे (Media), दोन्ही, print पण आणि electronicपण. समाजातील प्रत्येक समस्येला मिडीया जबाबदार आहे, असे मानणाऱ्यात मी नाही. पण, प्रसारमाध्यमांची पोचच इतकी खोलवर आणि दूरपर्यंत झाल्ये, की उत्तरप्रदेशातील एखाद्या खेड्यात कोणा डॉक्टरने एखाद्या पेशंटवर बलात्कार केल्याची घटना घडली, किंवा मुंबईत एखाद्या झोपडपट्टीतील डॉक्टरच्या दवाखान्यात गर्भपात (criminal abortion) करताना एखादी मुलगी दगावली, तर २४तासात देशभर खेडोपाडी ही बातमी पोचते.
जिथे, एक-एक सेकंदाची (Airtime) किंमत लाखो रुपये आहे तिथे तो संबंधीत डॉक्टर हकीम होता, "वंशपरंपरागत आहे" म्हणून फावल्यावेळात वैद्यकी करणारा वैदू होता, बोगस डॉक्टर होता, की वैध डीग्री असलेला सुप्रशिक्षीत डॉक्टर होता याची शहानिशा करुन माहिती देणे शक्यच होत नाही.
आणि प्रेक्षक/श्रोता/वाचकाची अशी खात्री होते की सर्वच डॉक्टर बलात्कारी किंवा चोर-गुन्हेगारी वृत्तीचे आहेत!
मिडीया काही हेतूपुरस्सर कट म्हणून असे करत नाही. शेवची तोही एक व्यवसायच आहे. आणि, केवळ सनसनाटी बातम्याच खपतात हे या धंद्याचे नाकारता येणारे सत्य आहे. त्यामुळे मग तीच गोष्ट Cut Practice ची, आणि तीच गत बीला करता एखाद्या पेशंटचे कलेवर अडवून ठेवल्याच्या बातमीचीही. ' बीला करता एखाद्या पेशंटचे पार्थिव अडवून ठेवणाऱ्या एका डॉक्टरमागे, पगारापर्यंत विश्वासाने बील उधार ठेवणारे हजारो डॉक्टर असतात' किंवा 'भरमसाटबीले घेणारे डॉक्टर जसे आहेत तसेच एखाद्या गरीबपेशंटला औषधे घेण्यासाठी आपल्या खिशातून बीनबोभाट पैसे काढून देणारे देखिल अगणित डॉक्टर समाजात आजही आहेत ' या गोष्टींची, कितीही खऱ्या असल्या तरीही, कधी "Breaking News" होऊच शकत नाही!
आपण स्वतःशीच थोडा विचार करुन पहा. त्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करुन पाहूया.
वैद्यकीय व्यवसायातील तुमच्या दृष्टीने सर्वात वाईट अश्या प्रवृत्तींची किंवा तुमच्या मते डॉक्टरमधे अजिबात असता कामा नये अश्या -१० दुर्गुणांची यादी बनवा; आणि आता प्रामाणिकपणे स्वतःला विचारा की यातील वैद्यकीय व्यवसायाविषयीची किती मते ऐकीव माहितीवर आधारीत आहेत, आणि तुम्हाला स्वतःला एखाद्या डॉक्टरमध्ये यापैकी किती दोषांचा अनुभव आलाय? आपल्या परिचयाच्या किती डॉक्टर्समध्ये या प्रवृत्ती, हे दुर्गुण आहेत? तुमच्या नेहमीच्या (Family Doctor) मध्ये हे दुर्गुण आहेत का? माझे असे अजिबात म्हणणे नाही की या निकषावर सर्व डॉक्टर्स १००% निर्दोष ठरतील. पण हे ही तितकेच खरे की, 'सर्वच डॉक्टर लबाड, चोर आणि खोटारडे असून, आपल्यांना लुटायलाच टपलेले आहेत, आपल्या बऱ्या-वाईटाशी त्यांना काहिही घेणं-देणं नाही' अशी अगदी निराशाजनक परिस्थिती देखिल नाही, एवढे तरी तुम्हाला पटले असेल.
बहूसंख्य लोकांचा या व्यवसायाविषयीचा अनुभव बरा/चांगला या श्रेणीत मोडणारा असतो. तरी समाजात त्याविषयी इतकी विषारी भावना निर्माण व्हायला कारणीभूत आहे, वर उल्लेख केलेला समिकरणातील दुसरा घटक.
गेल्या २०-२५ वर्षांत सामान्य रुग्णांची मनापासून काळजी असणाऱ्या आणि रुग्ण-ग्राहकांच्या हक्कांसाठी हिरहीरीने लढणाऱ्या मंडळींची एक फळी पुढे आली आहे. त्याच्या हेतू आणि खरेपणाविषयी मला तीळमात्र शंका नाही. पण, रुग्ण-ग्राहकांना जागे करण्याच्या आणि आपला मुद्दा त्वेषाने मांडण्याच्या नादात या मंडळींना आपल्या मूळ हेतूचा विसर पडल्यासारखे वाटते!
बहूसंख्येने असलेल्या प्रामाणिक डॉक्टरांनासुद्धा वैद्यकीय व्यवसायातील गैर प्रवृत्तींबद्दल घृणाच आहे! असल्या बहकलेल्या डॉक्टरांच्या गैरवर्तणूकीचा पहिला फटका बसतो तो या प्रामाणिकपणे आपले काम करणाऱ्या डॉक्टरांना! या मूक आणि बहूमतात असलेल्या (The Silent Majority) डॉक्टर्सना या activist लोकांनी आपल्या लढाईत आपल्याबाजूने सामिल करुन घेतलं असतं तर ते योग्य आणि सर्वच दृष्टीने फायद्याचं ठरलं असतं. पण त्याऐवजी या मंडळींनी 'सगळेच डॉक्टर चोर आहेत' असा ढोल बडवायला सुरवात केली. (मला एक उत्सुकता आहे की, आपणस्वतः किंवा आपले कुटुंबीय आजारी पडले की हि मंडळी काय करतात!)
डॉक्टरांपेक्षा यात जास्त नुकसान सामान्य रुग्णांचे होते आहे.
सध्या, वैद्यकीय व्यवसायावर एकापेक्षा एक जाचक अशी नवनविन नियमने आणि बंधने (Rules & Regulations) येत आहेत. भरीला मिडीयामधील पराकोटीची नकारात्मक प्रसिद्धी! या दोन्हीमागिल गुणवत्तेचा (Merit) विषय घटकाभर बाजूला ठेवला तरी एक गोष्ट स्पष्ट आहे. या सगळ्यामुळे थेट आणि तात्काळ फायदा कोणाचा होत असेल तर तो मोठ्या, Corporate हॉस्पिटल्सचा. आपण अजाणतेपणाने (?) या Corporate Sectorची अप्रत्यक्ष लढाई लढत आहोत, हे वास्तविक या मंडळींच्या लक्षात यायला हवे होते!
या सततच्या हल्ल्यात छोटी नर्सिंग होम्स आणि फँमिली डॉक्टरांचे दवाखाने हळूहळू बंद पडायला सुरवात झाली आहे. हे असेच चालू राहिले तर सर्वसामान्य रुग्णांचे काय होईल याचा समाजाने आणि राजकीय नेतृत्वाने गंभिरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. हा निव्वळ,'लांडगा आला रे आला' च्या जातीचा melodrama नाही.
एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकीच स्वच्छ आहे.
     
       कोर्टाने काही म्हणू दे, वैद्यकीय व्यवसाय हा, किराणामालाचं दुकान किंवा फ्रीज-टीव्हीची विक्री इतका साधा-सरळ व्यापार नाही. यात मानवी जीवाचा आणि पर्यायाने मानवाच्या स्वत्वाशी निगडीत, अंतर्मनात खोलवर दडलेल्या मूलभूत भावनांचा संबंध येतो. त्यामुळे परस्परांवरील दृढ विश्वास हा डॉक्टर-पेशंट संबंधाचा अत्यावश्यक पाया आहे. कायदे करुन हा विश्वास पैदा करता येणार नाही, किंबहूना आपण जितके अधिक आणि जेवढे जास्तं जाचक कायदे बनवण्याचा प्रयत्न करु तितके हे संबंध परस्पर संशयाच्या आणि शत्रुत्वाच्या दलदलीत अधिक रुतत जातील. मातृत्व किंवा मैत्री याविषयी कायदे करण्याची कल्पनासुद्घा आपल्यांना हास्यास्पद वाटते! मग तितकेच नाजूक आणि बऱ्याचवेळा त्याहून महत्वाचे ठरणारे हे डॉक्टर-पेशंटचे नाते तेवढ्याच हळूवारपणे हाताळायला हवे असे नाही वाटत?
समाज, मिडीया, शासन हे आपापल्या मार्गाने जात राहतील. तुमच्या करीता माझी आपल्या दोघांच्या फयद्याची एक सूचना आहे. हे करुन तर पहा!
आपला डॉक्टर अगदी बारकाईने चौकशीकरुन काळजीपूर्वक निवडा. Family Doctorही संस्थाच दिवसेंदिवस लयास जात चाललीय. तुमचा Family Doctor असेल, तर त्याच्याविषयी देखिल पुन्हा नव्याने शहानिशा करुन घ्या. पण एकदा डॉक्टर निवडलात की त्याच्यावर १००% विश्वास टाका.
लक्षात ठेवा, तो ही एक माणूस आहे. त्याला हा भरवसा द्या की तुमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, अगदी काहिही झाले तरी! कधीतरी, वर्षातून एखादे वेळी - डॉक्टर्स डे च्या दिवशी, किंवा दसरा दिवाळीला, किंवा त्याच्या वाढदिवसाला - त्याला वीश करा, आणि पहा तुमची दोघांचीही मनःशांती किती सुधारते! हे विसरु नका की तो एक सुशिक्षीत, सुसंस्कृत, सभ्य माणूस आहे.
तुमच्या शालिनतेला तो तश्याच शालिनतेने प्रतिसाद देईल असे नाही वाटत तुम्हाला? आणि तसे झाले तर, तुम्हाला अडीअडचणीच्यावेळी केव्हांही विश्वासाने हाक मारता येईल असा हक्काचा आधार मिळेल आणि तो कोणत्याही दडपणाखाली राहता, तुम्हाला त्याची हुशारी आणि कौशल्याचा प्रत्येकवेळी लाभ देईल!
एक पेशंट म्हणून आपल्यांना देखिल दुसरे काय हवे आहे?